
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत म्हणा किंवा परमार्थात विश्वास दृढ श्रद्धेस फार महत्त्व आहे. दृढभाव, दृढश्रद्धा व दृढविश्वास हे जवळ जवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. तरी देखील क्रमवारीमध्ये दृढभावापेक्षाही दृढश्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. श्रद्धा ही भावापेक्षा वरची पायरी आहे. आणि दृढश्रद्धेपेक्षाही दृढविश्वासाला अधिक उच्चस्थान आहे.
माझ्या मनातील भक्तिभावना ही स्वामी समर्थावर आहे. परंतु अमुक ठिकाणची स्वामीमूर्ती मला नाही आवडत. तरी देखील स्वामी नाम आहे म्हणून श्रद्धेने मी नमस्कार करतो. परंतु अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली स्वामी समर्थाच्या पादुकांच्या समोर काहीही इच्छा प्रकट करा, ती पूर्ण होते हा माझा विश्वास आहे. तो माझा दृढ आहे. श्रोते हो, हे
उदाहरण समजावे म्हणून लिहिले आहे.
याचा शब्दश: अर्थ घेण्याची आवश्यकता नाही. कारण महाराज हे स्मर्तुग्रामी आहेत. श्रद्धेने, भक्तिप्रेमाने, विश्वासाने तुम्ही कधीही, कुठेही, केव्हाही त्यांचे स्मरण करा. महाराज त्याक्षणी तुमच्याबरोबर आहेत. कारण जीवनरूपी प्रवासाला जेवढी श्वासरूपी इंधनाची गरज आहे, तेवढीच देवाकरिता दृढ विश्वासाची नितांत गरज आहे.
श्वास बंद झाला म्हणजेच तुमचा दृढभाव संपला. दृढश्रद्धा संपली. तुमची जीवनयात्रा संपली आणि त्यामुळे विश्वास राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण विश्वास आधीच संपलेला असल्यामुळे देव मिळण्याचा प्रश्नच उरत नाही.
विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता।
सकल भोगीता होय त्यांचे तुका।।
भारतीय संस्कृती अतिउच्च आणि सर्वश्रेष्ठ आहे. आणि पतिव्रता ही त्या संस्कृतीच्या देव्हा-यातील देवता आहे. वेदकाळापासून आदिशक्तीची सरस्वतीची व माता लक्ष्मीची पूजा बांधण्याचा उच्च संस्कार भारतीय संस्कृतीकडे आहे.
जत्राचा निर्माता, पालनकर्ता आणि समतोलासाठी संहारकर्ता भगवान ब्रह्मा, विष्णू, महेशाचे आम्ही पालकत्व मानत आहोत. त्यांचे एकत्र प्रकटरूप म्हणजे दत्तप्रभू. या दत्तप्रभूंना धर्मरक्षासाठी वेळोवेळी अनेक अवतार द्यावे लागले. त्यातील कलियुगात आपल्यासाठी झालेले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज, त्यानंतर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि एकशे अडोतीस वर्षापूर्वी झालेला श्रीस्वामी समर्थ महाराजांचा अवतार होय. तसे वेगवेगळया युगामध्ये २४ अवतार दत्तप्रभूंनी घेतल्याचे उल्लेखित असले तरी दत्त महाराजांच्या प्रमुख सोळा अवतारांविषयी महानसंत दासोपंतांनी फारच छान वर्णन करून लिहिलेले आहे.
दत्त महाराजांच्या श्री स्वामी समर्थ अवतारातील लीलांचे वर्णन असणारा प्रासादिक ग्रंथ म्हणजेच श्रीगुरुलीलांमृत ग्रंथ होय. त्या ग्रंथात महाराजांच्या सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुगासह कलियुगातील प्रकट लीलांचे वर्णन, दृष्टांत समावलेले आहे. त्यातील दुस-या अध्यायात आलेला भक्ती विचारांचा आपण मागोवा घेत आहोत. आमच्या जीवनात आजमितीला त्याचा उपयोग काय? याचा सारासार विचार आपण करत आहोत.
तव सत्संकल्प यथाकृत। पूर्ण होईल निश्चित।।
यादृशी सद्भावना मनोगत। सिद्ध होय नान्यथा।।
या अध्यायात दत्तप्रभूंच्या जन्मकथेचे सुंदर वर्णन आलेले आहे. दत्तप्रभूंच्या माता अनुसयांच्या महान पतिव्रत्याचे वर्णन आहे. हे वर्णन वाचल्यानंतर कोणत्याही सत्संकल्प, सद्भावना, मनाची इच्छा कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होते. असे याचे फळ आहे.
थोडासा बारकाईने विचार करू! एक गृहस्थ आम्हाला भेटले. ते म्हणाले, आम्ही दोघे पती-पत्नी नोकरीत आहोत.
मला रात्रपाळी, दिवसपाळी असल्यामुळे आमचे कधी संभाषणच होत नाही. पत्नीचा स्वभाव रागीट आहे. लग्न होऊन आठ वष्रे झाली. आम्ही चिठ्ठय़ांवर निरोप लिहून ठेवतो. पण प्रत्यक्ष बोलत नाही. समजा अनपेक्षित पणे घरी असलोच तर पत्नी टीव्हीच्या सीरियल पाहत बसते.
मला त्याचा राग येतो. सीरियल कसल्या? दोन नवरे, दोन बायका, चार प्रियकर असं कुठं प्रत्यक्षात असतं का? असलं खोटं पाहण्यापेक्षा स्वत: हातानं बनवलेला स्वयंपाक सगळे एकत्र असून खाऊ. ती यातलं काहीही ऐकत नाही. मेसचा दररोज डबा येतो.
टीव्हीसमोर उभे राहूनच ती जेवते. मी नंतर जेवतो. आमचा एकमेकांवर विश्वास नाही. आमच्यात प्रेमभाव उरला नाही. एकमेकांवर श्रद्धाही राहिली नाही.
व्हॉट्सअपमुळे तिचे अनेक मित्र झालेले आहेत. त्यांच्यात सतत चॅटिंग चाललेले असते. या संसारातून विरंगुळा म्हणून ब-याच वेळा तिला न सांगता अक्कलकोटला येत असतो. महाराजांना प्रार्थना करत असतो.
एकदा माझ्यावर संशय घेऊन माझ्या पाठोपाठ माझा शोध घेण्यासाठी ती दुस-या गाडीने अक्कलकोटला आली. मी पारायण करत होतो. त्याठिकाणी मला न दिसेल अशी येऊन उभी राहिली. मी जी पोथी वाचत होतो त्या पोथीवरही तिने संशय घेतला. ती पोथी तिने विकत घेतली. वाचून काढली. तिस-या दिवशी आरतीच्या वेळी अचानक भेट झाली आणि तिने माझे पाय धरले. आजही आम्ही आनंदात आहोत. ही स्वामी समर्थाची किमया.