Quantcast
Channel: महाराष्ट्र – Prahaar.in
Viewing all articles
Browse latest Browse all 17269

स्वामी समर्थाचे शिष्यगण

$
0
0
book

शिष्य-प्रशिष्यांच्या या मांदियाळीतून श्रीस्वामी समर्थाच्या जीवनचरित्राचे एक आगळेच व मनोहारी दर्शन घडते. वटवृक्ष ज्याप्रमाणे विविध शाखा-प्रशाखांनी बहरून अवघे आसमंत कवेत घेतो, जमिनीची भेट अस्मानाशी करून देतो; तद्वतच श्रीस्वामीकृपेने पुनित झालेला हा समस्त स्वामीभक्तांचा परिवार आहे. मठांची नावे, शिष्यांची नावे वेगवेगळी असतीलही; पण सर्वाचे कार्य एकच आहे. स्वामीसेवा, श्रीस्वामी समर्थाचे अक्कलकोटमधील वास्तव्यात अक्षरश: लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेले होते. श्रीस्वामी समर्थानी स्वत:च अनेक भक्तांना मठ बांधून राहण्याचे म्हणजेच संप्रदायाच्या विस्ताराचे मार्गदर्शन केले होते. आज हा संप्रदाय दाही दिशांना विस्तारला आहे, ही किती आनंदाची बाब आहे.

bookश्री. पांडुरंग बाळकृष्ण तथा नाना परांजपे

श्री. पांडुरंग बाळकृष्ण तथा नाना परांजपे हे लोणावळा येथे राहतात. त्यांचे आजोबा श्री. श्रीधर बापूजी परांजपे हे राजापूर तालुक्याती आडिवरे येथे राहतात. नानांचे वडील शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत आले व रेल्वेत नोकरी करू लागले. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर नानांच्या मातोश्री मुलांसह अलिबाग तालुक्यातील सासवणे येथे माहेरी परतल्या.

खूप कष्ट करून त्या माऊलीने मुलांना लहानाचे मोठे केले. पुढे श्री. नानांनी मुंबईत त्यांच्या भगिनीकडे राहून शिक्षण पूर्ण केले. वयाच्या विसाव्या वर्षी ते लष्करात भरती झाले. १९४९ साली ते विवाहबद्ध झाले, पण ते मुंबईत व पत्नी सासवणे येथे असा संसार सुरू झाला. १९५५ साली चेंबूर येथे श्रीस्वामी समर्थाच्या घराजवळ भाडेतत्त्वावर राहावयास जागा मिळाली.

तोपर्यंत नानांना श्री शंकराखेरीज अन्य देवतांबद्दल प्रेमभाव नव्हता. ते श्री शंकराचे उपासक होते. हळूहळू त्यांना श्रीस्वामी समर्थाकडून संदेश मिळू लागले. एके दिवशी श्रीस्वामी नाना परांजपे यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, माझ्यात आणि श्री शंकरात काय फरक आहे? १९६० मध्ये श्रीस्वामी त्यांना आकाशमार्गाने अक्कलकोट येथे घेऊन गेले, तेथे त्यांनी श्रीचोळाप्पांच्या मठात नानांना चरणतीर्थ दिले.

१९६० मध्ये एका पहाटेस नाना परांजपे यांच्या सूक्ष्म देहाने त्यांचा जड देह सोडून शून्य मंडळात भरारी घेतली. नाना तेथील सुवर्णाच्या राजवाडयात शिरले, तेथे त्यांना श्रीस्वामी समर्थाची अतिशय लखलखणारी तेज:पुंज मूर्ती दिसली.

श्रीस्वामींनी त्यांना तीन पाय-या चढून येण्यास सांगितले. या सत्त्व, रज व तम या त्रिगुणांच्या प्रतीक होत. त्यानंतर श्रीस्वामींनी नानांना मला ओळखलेस का, असे विचारले. नानांनी होकार दिल्यावर श्रीस्वामी म्हणाले, आता मी तुझ्यातून अंशात्मक प्रकट होऊन माझे अवतारकार्य करीन.

तेव्हा नाना चाचरत म्हणाले, मी विवाहित आहे. तेव्हा श्रीस्वामी म्हणाले, चिंता करू नकोस. यापुढे काय होते ते पाहा. श्रीस्वामींनी नानांना मंत्राची दीक्षा दिली. याखेरीज त्यांनी नानांना एक विशेष मंत्र दिला, तो संकटकाळी फक्त तीन वेळा म्हणावयाचा होता. त्यानंतर श्रीस्वामी अंतर्धान पावले.

श्रीस्वामींनी दिलेला दुसरा मंत्र नाना विसरून गेले. आता काय करावे अशा विचारात ते असतानाच त्यांच्यापुढे श्रीदत्तात्रेय प्रकट झाले. त्यांनी विचारले, तू तो मंत्र विसरला आहेस का? नानांनी होकार दिल्यावर त्यांनी तो मंत्र नानांना पुन्हा दिला. नाना त्या महालातून बाहेर पडताच त्यांना एक प्रेत दिसले. त्यांनी श्रीस्वामींची प्रार्थना केली, आपले पवित्र पावन दर्शन झाल्यावर हा अशुभ शकून कसला? त्यांच्या अंत:चक्षुंपुढे श्रीस्वामींची कमलासनावर बसलेली मूर्ती प्रकट झाली, ते म्हणाले, त्या प्रेताला संजीवन प्राप्त झाले.

त्यानंतर पाच वर्षानी नाना श्री नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता महाराजांनी त्यांना काय इच्छा असेल ते माग असे म्हटले. तेव्हा नाना म्हणाले, माझ्याकडे जे पीडित आणि व्याधीग्रस्त लोक येतील त्यांचे दु:ख दूर करण्याची शक्ती मला द्या. त्यांच्या उत्तराने प्रसन्न होऊन महाराज म्हणाले, हे तर माझ्या सद्गुरूंचेच काम आहे. तुला सामर्थ्य मिळेल. गुरुद्वादशीस श्रीमहाराजांनी त्यांना एक भगवी छाटी व एक पवित्र मंत्र दिला.

श्री. नाना परांजपे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्याजवळ आपटा रोड नाका येथे श्रीस्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र स्थापन केले आहे. साधनेत अत्युच्च शिखर गाठण्याची आकांक्षा असलेल्या साधकांना नानांचा संदेश आहे की, आपल्या सहप्रवासी मानवांबद्दल निरपेक्ष प्रेम बाळगून त्यांची नि:स्वार्थ भावाने सेवा करण्यानेच साधक भगवतांशी त्वरित जवळीक साधू शकतो.

कोणीही आपल्या विहित कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये. उलट ती अतिशय तन्मयतेने आणि अथक प्रयत्न करून फलाशा न धरता अलिप्त वृत्तीने केली पाहिजेत. प्रथम आपली ऐहिक कर्तव्ये योग्यरीत्या पूर्ण करा आणि नंतर परमार्थाच्या वाटेवरचा सुगंध उपभोगा.

श्री. नानांनी १९७८ साली श्रीस्वामी समर्थाचे चरित्र व श्रीगुरूचरित्र इंग्लिश भाषेत लिहून प्रकाशित केले आहे. श्रीस्वामींची सहस्त्रनामावलीही त्यांनी प्रकाशित केली आहे.

श्री. नाना गद्रे

श्री नामदेव महाराजांनी २८ ऑक्टोबर, १९७१ रोजी महासमाधी घेतली. महासमाधी घेण्यापूर्वी नामदेव महाराजांनी नाम जपाच्या आध्यात्मिक रथाचे सारथ्य नाना गद्रे यांच्याकडे सोपविले. नाना हे कोल्हापूर येथील एका सूतगिरणीच्या जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले आहेत.

आपल्या व्यवस्थापकीय अधिकाराचा वापर त्यांनी कधीही वैयक्तिक लाभासाठी केला नाही, तर त्या अधिकारांचा वापर गरजूंना मदत व त्रस्त व्यक्तींना दिलासा मिळावा यासाठीच केला. १९५८च्या अखेरीस नाना यांना अंर्तदृष्टीपुढे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे दर्शन झाले, त्यानंतर श्री नामदेव महाराज दिसले.

ते म्हणाले, साहेब (ते नानांना या नावाने हाक मारत असत.) आजपासून तू माझा झालास. त्यांनी नानांना त्यांची कोल्हापूर येथील मठी, श्रीजगदंबेचे मंदिर व श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे समाधीस्थान दाखविले. कोल्हापुरात आल्यावर श्री नामदेव महाराजांच्या अतिदक्ष नजरेखाली नानांची साधना तीव्र होऊ लागली. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग महत्त्वपूर्ण आहे.

एकदा नाना अनवधानाने आपल्या सहका-याला रागाच्या भरात काही अपशब्द बोलले. दुस-या दिवशी नाना नित्याप्रमाणे श्री नामदेव महाराजांच्या भेटीस गेले, तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, साहेब, तुला माहीत आहे काय? शब्दध्वनी कधीही नष्ट होत नसतो. आणि तरीही तू काल बोलू नये ते बोललास. तू जे बोललास ते ब्रह्याने कायमचे जतन करून ठेवले आहे.

तुला ते ऐकायचे आहे काय? आपल्या मार्गदर्शकाच्या सर्वकष जाणतेपणाने नाना गोंधळून गेले. महाराज पुढे म्हणाले, साहेब, आपल्या तोंडून आत काय जाते यापेक्षा तोंडातून बाहेर काय पडते ते महत्त्वाचे आहे. पुढे महाराजांनी श्री. नानांना दीक्षा देऊन बीजमंत्र दिला.
नानांनी परमपूज्य श्री नामदेव महाराज चरित्र सुगंध हे चरित्र लिहून प्रकाशित केले आहे. त्यात त्यांनी साधकांना मोलाचा उपदेश केला आहे, की त्यांनी सतत अनाहत नादाच्या अनुसंधानात राहून श्वासावर नियंत्रित असा उत्स्फूर्त नामजप अखंड चालू ठेवावा.


Viewing all articles
Browse latest Browse all 17269

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>