
समुद्री कासवांच्या अंडय़ांचे संवर्धन करून त्यातून बाहेर आलेली १७३ पिल्ले समुद्रात सोडण्यात आल्याने कासव संवर्धन मोहिमेच्या दृष्टीने या समुद्रकिना-याचे महत्त्व वाढले आहे.
राजापूर- माडबन गावातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य अशा निळय़ाशार सागर किना-यावर यावर्षी तब्बल दोन वेळा सापडलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ या समुद्री कासवांच्या अंडय़ांचे संवर्धन करून त्यातून बाहेर आलेली १७३ पिल्ले समुद्रात सोडण्यात आल्याने कासव संवर्धन मोहिमेच्या दृष्टीने या समुद्रकिना-याचे महत्त्व वाढले आहे. पर्यटकांबरोबरच प्राणी, पक्षी मित्रांसाठीही हा समुद्रकिनारा त्यामुळे आकर्षण ठरणार आहे.
माडबन समुद्रकिना-यावर कासव येतात आणि अंडी घालतात, असा अंदाज वन विभागाला आला होता. त्यादृष्टीने मागील वर्षभर वन विभागाचे या समुद्रकिना-याकडे विशेष लक्ष होते. विभागीय वनअधिकारी, परीक्षेत्र वनअधिकरी यांच्यासह वन विभागाच्या कर्मचा-यांनी याकडे विशेष लक्ष दिले होते. तर स्थानिक पातळीवर माडबन सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह या परिसरातील ग़्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
या कासवांचा अंडी घालण्याचा हंगाम हा नोव्हेंबर ते एप्रिल असा असतो. एका वेळेला एक मादी १५० ते २०० व कदाचित त्यापेक्षा जास्त अंडी घालते. त्यानतंर ५३ ते ५४ दिवसांनी या अंडय़ातून पिल्ले बाहेर पडतात. यापूर्वी डिसेंबरमध्ये अशा प्रकारे ‘ऑलिव्ह रिडले’ची १२५ अंडी आढळून आली. त्यांचे वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने संवर्धन केले आणि ८५ पिल्ले समुद्रात सोडली.
त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारीमध्ये कासवांनी याच परिसरात १३५ अंडी घातली. याचेही संवर्धन करून ८८ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यावर्षी वन विभागाने तब्बल दोन वेळा ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
भविष्यात माडबन समुद्रकिना-याकडे वन विभागाचे विशेष लक्ष राहणार असल्याचे राजापूरच्या वनपाल राजश्री कीर यांनी सांगितले. पुढच्या वर्षी कदाचित ही संख्या वाढलेली असू शकते. भविष्यात गुहागर येथील वेळास प्रमाणे राजापुरातील माडबन समुद्र किना-यावरही कासव महोत्सवाची संधी नाकारता येत नसल्याचे कीर यांनी सांगितले.