
भाजपा व शिवसेनेने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेला दिलेली आश्वासने, केलेल्या घोषणा आता हवेत विरल्या आहेत.
कुडाळ- भाजपा व शिवसेनेने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेला दिलेली आश्वासने, केलेल्या घोषणा आता हवेत विरल्या आहेत. सर्वसामान्यांचे हे सरकार राहिलेले नाही. देशात भाजपा-सेना सरकारच्या विरोधी वातावरण आहे.
निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ज्या गतीने लाट आली होती, त्याच गतीने ती आता अधोगतीकडे चालली आहे. जनतेला समजून चुकले आहे की भाजपा-शिवसनेने आपली घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे सर्वत्र परिवर्तनास सुरुवात झाली आहे. या परिवर्तनाच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा. असे आवाहन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.
कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कु डाळ न.प.निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून, श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कोकणात आम्ही आणलेले प्रकल्प बंद आहेत. भाजपा-सेनावाल्यांनी कोणतेही नवे प्रकल्प आणलेले नाहीत. सी-वर्ल्ड, विमानतळ, रेडीबंदर, आयटीपार्क, दोडामार्ग एमआयडीसी हे आम्ही आणलेले सगळे प्रकल्प ठप्प आहेत. प्रकल्पच होणार नसतील तर त्यातून रोजगारनिर्मिती कशी होणार? येथील बेरोजगारांनी काय करावे, कुठे जावे, हे सत्ताधारी सांगू शकत नाहीत, याकडे लक्ष वेधत नारायण राणे यांनी सरकारच्या धोरणावर टिकास्त्र डागले.
आमदार अस्तित्वहिन, खासदाराची हिंदी अजबच!
जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. पुळचट पालकमंत्री काहीही करू शकत नाही. येथील आमदाराचे तर अस्तित्वच नाही. कधी विधानसभेत बोलतच नाहीत. तेथील नियम, प्रथा हे त्यांना काही कळतच नाही.
जो माणूस ग्रामपंचायतीमध्ये कधी बोलला नव्हता तो विधानसभेत काय बोलणार? येथील खासदार हा एसएससी ला दोन वेळा नापास झालेला आहे. त्यामुळे तो लोकसभेत काय बोलणार आणि काय प्रश्न सोडविणार. लोकसभेत हा खासदार जी हिंदी भाषा बोलतो त्याची लाज वाटते.
विदर्भाला विज बिलात सुट, कोकणची मात्र लूट
राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भाला विज बिलामध्ये एक रुपयाची सुट दिली आहे. मात्र काँग्रेस आघाडी सरकारने रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हय़ांना विज बिलात दिलेली एक रुपयाची सुट मात्र काढून टाकली आहे. हा अन्याय सहन कसा करता? अन्याय झाल्याने पेटून उठले पाहिजे. हीच संधी आहे, असे आवाहनही राणे यांनी केले.