
अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते शुक्रवारी आपापसात भिडले. यात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विवेक कलोती जखमी झाले.
अमरावती- अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते शुक्रवारी आपापसात भिडले. रवी राणा यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणा-या भाजपा कार्यकर्त्यांवर विटा फेकण्यात आल्यानंतर चिडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.
या प्रकरणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या. या धुमश्चक्रीत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विवेक कलोती जखमी झाले आहेत.
रवी राणा यांनी अमरावतीतील भीम टेकडीवर उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. परवानगी नाकारल्यानंतरही रवी राणा यांनी बुधवारी रात्री या पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले.
पोटे यांच्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली, असा आरोप रवी राणा यांनी केला. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते चिडल्याने त्यांनी शुक्रवारी सकाळी राजा पेठ भागातील रवी राणा यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्याच वेळी कार्यालयाच्या इमारतीवरून निदर्शकांवर विटा फेकण्यात आल्याने भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी रवी राणा यांच्या कार्यालयात घुसून तिथे तोडफोड केली.