
गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणा-या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा संपली. पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली.
लातूर- गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणा-या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा अखेर संपली. पाणी एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाली आहे.
मिरज रेल्वे स्थानकातून सोमवारीसकाळी निघालेली पाणी एक्सप्रेस कुठला ही थांबा न घेता मंगळवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाली असून यावेळी लातूरकरांनी मोटरमन गार्ड आणि सोबत आलेल्या आरपीएफच्या जवानांचा खास सत्कार केला.
रेल्वे वाघिण्यांतून आणण्यात आलेले ही पाणी प्रथम लातूर रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत सोडले जाणार आहे.
‘आम्ही सर्वप्रथम पिण्याचे पाणी पुरवण्याला महत्त्व देणार आहोत. रेल्वे वाघिण्यांतील पाण्याचे शुद्धीकरण केले जाईल. त्यानंतर या पाण्याचे वितरण केले जाईल,’ अशी माहिती लातूर महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली.
प्रथम हे पाणी लातूर रेल्वे स्थानकाजवळील देशमुख यांच्या विहिरीत सोडले जाईल. यासाठी रेल्वे स्टेशन ते देशमुख यांच्या विहिरीपर्यंत सहाशे मीटरची जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही येथील नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना रेल्वेने पाणी पोहोचवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. याबाबत रेल्वेशी चर्चा करून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री राजस्थानमधील कोटा येथून ‘पाणी एक्सप्रेस’ रवाना झाली होती.
लातूरकरांसाठी चाचणी तत्त्वावर ‘जलभेट’ असून १७ एप्रिलपासून २५ लाख लिटर्सची रेल्वे देण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
‘जलराणी’ मिरजेतून लातूरकडे रवाना
लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची रेल्वे अखेर मिरजेतून लातूरकडे रवाना झाली आहे.
‘पाणी एक्स्प्रेस’ उद्या लातूरला पोहोचणार!
राज्याच्या दुष्काळग्रस्त भागांत पाणी पोहोचवण्यासाठी राजस्थानच्या कोटा येथून पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमतेची रेल्वेची ‘पाणी एक्सप्रेस’ मंगळवारी लातूरकरांची तहान भागवणार आहे.