
राज्यातील नेतृत्वासाठी, कोकणच्या अस्मितेसाठी आक्रमक असणारे लोकनेते नारायण राणे हे आपले वडील आहेत, याचा मला अभिमान वाटतो.
राज्यातील नेतृत्वासाठी, कोकणच्या अस्मितेसाठी आक्रमक असणारे लोकनेते नारायण राणे हे आपले वडील आहेत, याचा मला अभिमान वाटतो. त्यांची आक्रमकता कोकणवासीयांवरील अन्यायाविरोधात व महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी असून; त्यांच्यातील संवेदनशीलता आणि माणुसकी यांना सलाम करणारी आहे, असे मनोगत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त करतानाच वडील, माणुसकी असणारा नेता, त्यांचे कर्तृत्व आणि दातृत्व याबाबतचे अनुभव या सोहळयात उलगडले.. आणि सर्वानीच टाळयांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
कधी डोळयात अश्रू आणत तर कधी मर्मभेदी टिप्पणी करत माजी खासदार निलेश राणे यांनी नारायण राणे यांचे वेगळे पैलू पुढे आणले. लोकांना जपण्याची पद्धत आणि त्यांचे मार्गदर्शन त्यांच्यासोबत फिरताना मला खूप काही देऊन गेले. त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध करताना स्वत:ला जमेल ते राजकारण केले. दुसरा करतो म्हणून आपण केले पाहिजे, असे कधीही जाणवले नाही.
त्यांनी स्वत:चा आदर्श स्वत: निर्माण केला व संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकारणातही हे दाखवून दिले. महाराष्ट्रातील सर्व भागात त्यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी असून आजही त्यांना सोडून दुस-या पक्षात गेलेले अनेक जण त्यांची आपुलकीने चौकशी करतात. आक्रमकता दाखवली तरी त्यांच्यातील माणुसकी आणि त्यांचे दातृत्व मोठे आहे, असे सांगत राणेसाहेबांचा आदर्श त्यांनी उलगडून सांगितला.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची आठवण सांगताना त्यांनी अनेक भावनिक व आत्मीयतेचे प्रसंग सांगितले. राणेसाहेब बाळासाहेबांचा फोटो काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या खिशात बाळगत होते. बाळासाहेबांचे निधन झाले तेव्हा ते लंडनमध्ये होते. मी मुंबईत होतो; मात्र ही घटना सांगायचे धाडस मला झाले नाही. म्हणून ही घटना मी माझ्या आईला सांगितली. आईने त्यांना सांगताच त्यांना रडू कोसळले.