Quantcast
Channel: महाराष्ट्र – Prahaar.in
Viewing all articles
Browse latest Browse all 17269

अनुभव

$
0
0
Swami Samarth Maharaj

पहाटे सकाळी ३.१५ ते ४ ला उठून श्री स्वामी समर्थ शांत बसायचे. कारण ती वेळ ब्राह्म मुहूर्ताची होती.

Swami Samarth Maharajपहाटे सकाळी ३.१५ ते ४ ला उठून श्री स्वामी समर्थ शांत बसायचे. कारण ती वेळ ब्राह्म मुहूर्ताची होती. ब्राह्म म्हणजे तरी काय? सूर्य उगवण्याच्या अगोदर अडीच तासाच्या कालावधीला ‘ब्राह्म मुहूर्त’ असे म्हणतात. या वेळेत हवेत ऑक्सिजन असतो.

म्हणजे आपण या वेळेत प्राणवायू घेतो आणि प्राणवायू सोडतो. या वेळेत हवेत ओझोन नावाचा वायू असतो की जो शरीरासाठी, चांगल्या आरोग्यासाठी पूरक असतो. या वेळेत मंत्र सजीव असतात. त्या त्या मंत्राच्या देवता निर्गुण रूपांत अवकाशांत फिरत असतात. या वेळेत केलेले चिंतन कायम स्मरणात राहते.

जगात काम करणारे सर्वच पदस्थ हे ब्राह्म मुहूर्तावर उठून विचार-विनिमय-चिंतन-अभ्यासाला बसलात तर तो जास्तीत जास्त मार्कस् मिळवून स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करतो.

श्री स्वामी समर्थ ब्राह्म मुहूर्तावर उठून शांत बसून सकाळी पहाटे चार ते सव्वा चार या वेळेत पुढील दहा तासांत अक्कलकोटला आश्रमांत कोण-कोण येणार आहेत याची इत्यंभूत माहिती द्यायचे. नंतर डोगरावर एकांतात निघून जायचे. नंतर दिवसभराच्या कालावधीत श्री स्वामींनी वर्णन केलेली भक्तमंडळी यायची.

ब्राह्म मुहूर्त आणि ब्रह्म मुहूर्त यांत काय फरक आहे? जे साधक या वेळेस उठून साधना करतात त्यांच्या घरासमोर ब्राह्मी वनस्पती उगवते, वाढते. त्याच वेळेस साधना केल्यामुळे ब्रह्मज्ञानाची जाणीव व ज्ञान होते. ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस कोकिळा-कोकीळ, मोर, भारद्वाज पक्षी, मुंगूस, कावळयाचा कानाला मधुर वाटेल असा आवाज, पांढरा उंदीर यांचे दर्शन होते.

वैज्ञानिक म्हणतात की, ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस ओझोन वायू-प्राणवायू विपुल प्रमाणांत असतो. ऋणयनांचे अधिक्य व धनात्मक ऊर्जा असते, जी स्वास्थ्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठी हितकर असते. ऋषी, मुनींचे संकल्प असतात. त्याचबरोबर नि:संकल्प नारायणाच्या ध्यान समाधीचे तरंगही वातावरणांत असतात.

प्रात: काल की वायू को, सेवन करत सुजन।
तांते मुख छबी बढत है, बुद्धी होत बलवान।।

अशा प्रात: काळी मंत्र जप करून आपण मंत्राच्या ऋषींची कृपा विशेष रूपांत मिळवू शकतो. या वेळेत प्राणायम, कमाल भाती केल्यास मन:शक्ती, प्राणशक्ती, भावशक्ती, क्रियाशक्ती, अनुमान शक्ती, क्षमा शक्ती, शौर्य शक्ती व शारीरिक आरोग्य विकसित होते.

श्री. दत्तगुरू गुरुचरित्रांतील अध्याय ३६ वा श्लोक १४४ मध्ये सांगतात, ‘ब्राह्म मुहूर्ती उठोनी। श्री गुरुस्मरण करोनी..!’


‘आम्ही उभे आहोत, फक्त दर्शन द्या।

आम्ही बसलो आहोत बोला काय बोलायचे ते।।’

हे श्री स्वामी समर्थाचे वाक्य आहे. याचा अर्थ काय तर श्री स्वामी समर्थ उभे आहेत, किंवा जेथे समर्थाची उभी मूर्ती आहे तेथे फक्त दर्शन घेऊन भक्त गण निघून जातील. तेथे येणा-या भक्तांची सुविधा, काहीही दिसणार नाहीत.

पण जेथे समर्थाची बसलेली मूर्ती आहे तेथे या, बसा, प्रसाद घ्या, महाप्रसाद घ्या, नंतर चहा घ्या. स्वामींकडे काय मागायचे आहे ते मागा! इत्यादी.. यावरुन बोध काय तर, श्री स्वामी समर्थ बसले आहेत असा फोटो घरांत असावा. हा फक्त ज्ञानाचा भाग आहे.

३० मे २००३ रोजी माझ्या पनवेलच्या राहत्या घरी श्री स्वामी समर्थाची बसलेली मूर्ती अभछत्रासाठी दान, भेट म्हणून आली. पुढील व्यवस्था होईपर्यंत ती आमच्या पनवेलच्या घरी ठेवण्यात आली. साडेतीन वर्षांनी ही मूर्ती लोणावळा अभछत्रामध्ये स्थानपन्न झाली. ही पूर्वी मालाड मध्ये राहणारे आणि सध्या पुणे येथे स्थायिक झालेले श्री. हजारे यांनी अभछत्राला भेट, दान म्हणून दिली.

त्या अगोदर एक उभी अशी (आठ फूट उंचीची) दत्त मूर्ती संस्थेला भेट म्हणून आली होती. सदर दत्त मूर्ती कोथरूड येथील नाफडे यांनी संस्थेला भेट म्हणून दिली होती. ही मूर्ती सुद्धा आमच्या पनवेल येथील घरी चार वर्षे ठेवण्यात आली होती. येथे श्री स्वामी समर्थाच्या ‘मूळ पुरुष दत्त नगर’ ह्या वाक्याची प्रचिती येते.

सर्वानी अवश्य लोणावळा येथे जाऊन दत्त मूर्ती तसेच श्री स्वामींच्या बसलेल्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. या दोन्ही मूर्तीसमोर दोन हजार दोनशे बावीस वेळा संस्कृत रुद्र म्हणण्याचा उपक्रम राबविला तर सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठून सुर्चिभूत होऊन १०० वर्षांपूर्वी साकार झालेल्या श्री विष्णू आण्णा थोरात यांनी लिहिलेल्या पोथीची एक हजार एकशे अकरा पारायणे करण्यात आली.

आम्हीच राम झालो, आम्हीच कृष्ण झालो होतो. हे श्री स्वामी समर्थाचे एक वाक्य! खूप संतांनी आपापल्या भक्तांना किंबहुना सर्वानाच विविध देवता स्वरूपांत दर्शन दिले! पण स्वामींनी मात्र इतर देवता स्वरूपांत दर्शन तर दिलेच, आणि आदिमाया स्वरूपांत अवतार साकार करून दाखविला.


आम्हीच राम झालो, आम्हीच कृष्ण होऊन गेलो हे स्वामींचे वाक्य वाचले आणि श्री कृष्णाच्या द्वारकेपर्यंत आपण पायी प्रवास करावा अशी प्रेरणा झाली. दुधात साखर टाकावी, त्याप्रमाणे माझ्या आईचा जन्म गोकुळ अष्टमीतला..! आणि द्वारकेची पदयात्रा ठरली.

१९९० मध्ये मुंबई-द्वारका हा पायी प्रवास २९ दिवसांत १२५० किमी, श्री स्वामींनी माझ्याकडून करवून घेतला. दरवर्षी एखादी छोटी पदयात्रा आणि पांच वर्षांतून एखादी मोठी पदयात्रा असा माझा जीवन प्रवास सुरू झाला. आणि हे सारे नोकरी, संसार संभाळून! श्री स्वामींच्या वाक्यांत केवढी ताकत आहे, याची प्रचिती येते. आणि या सा-या पदयात्रा करुन त्या श्री स्वामींना किंबहुना ज्या संस्थेत आम्ही काम करतो त्या संस्थेला अर्पण करायच्या!

मी गुरुपुष्यामृत आणि रामनवमी या दिवशी एका सरकारी बँकेत नोकरीला लागलो. आणि वयाच्या साठाव्या वर्षी आनंदाने निवृत्त झालो. माझ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षांपासून घरांत सूर्योदय ते सूर्यास्त असा सतत नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू झाला.

तर २५ डिसेंबर दर वर्षी सूर्योदय ते सूर्यास्त श्री स्वामी समर्थ असा सतत नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू झाला. ही श्री स्वामी समर्थ शक्तीची फार मोठी प्रचिती! हा आणि असा अनुभव सर्वाना यावा अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..!


१९९७ सालच्या डिसेंबर महिन्यातील गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस होता. सकाळीच देवपूजा आटोपली. सद्गुरू श्री साटम महाराजांच्या तसबिरीसमोर ध्यान केले आणि वंदन करून उठलो. गुरुपौर्णिमा असल्याने समर्थ श्री साटम महाराजांच्या २०८, गणेशबाग, डॉ. आंबेडकर मार्ग, माटुंगा (पूर्व), मुंबई-१९ येथे असलेल्या दत्तमंदिरात जाऊन श्री समर्थ दर्शन करावे असे मनाने ठरवले.

परंतु तातडीच्या कार्यबाहुल्यामुळे आज काही जाणे शक्य होणार नाही, असे दुसरे मन सांगू लागले. कारण नोकरीच्या जागी प्रमोशन देऊन माझी अन्यत्र बदली दाखवण्यात आली होती व मी नवीन जागी जाण्यास अनुत्सुक होतो. त्यामुळे झालेली बदली मी रद्द होऊन आहे त्याच ठिकाणी माझी नेमणूक व्हावी, म्हणून मी प्रयत्नात होतो.

मात्र याच दरम्यान प्रयत्न मार्गी लागावेत म्हणून मी डॉक्टरी रजेवर असल्याने माझे मासिक वेतन रोखण्यात आले होते. त्यामुळे आपसूकच मी आर्थिक विवंचनेतही होतो. भिडस्त स्वभाव असल्याने प्रापंचिक गरजा भागवताना कुचंबणा होत होती. परंतु माझा स्वत:चा काही खर्च नसल्याने जेमतेम भागत होते. अगदीच निकडीच्या वेळी श्री समर्थ कृपेचा प्रसाद कामी येत होता.

आज तरी प्रयत्नांना यश येऊन माझ्या बदलीचे मनाजोगते काम व्हावे, म्हणून मी श्री समर्थाना प्रार्थना केली व माझ्या वरिष्ठांसमोर गाऱ्हाणे मांडण्यासाठी जात असून माटुंगा येथील मंदिरात कदाचित हजर राहाता येणार नाही तेव्हा क्षमा असावी म्हणून कळकळीने हात जोडले व घराबाहेर पडलो. यावेळी माझ्या खिशात अवघे पंधरा रुपये होते.

मला दादरला शिवसेना भवनच्या शेजारी असलेल्या माझ्या वरिष्ठांच्या कार्यालयात दुपारी एक वाजेपर्यंत पोहोचायचे होते. मात्र कार्यालयाची इमारत नेमकी कुठे आहे? ते मला माहीत नव्हते. सेनाभवनच्या येथील एका दुकानदाराला पत्ता विचारला असता त्याने जवळच्या रस्त्याने पुढे जा म्हणून सांगितले. त्या रस्त्याचे नाव होते डी. एल. वैद्य मार्ग. त्या रस्त्याला लागूनच मोठा उत्सव सुरू होता. रस्त्यावरून येणा-या-जाणा-या लोकांना वा भाविकांना कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने आणि आग्रहाने तीर्थप्रसाद देत होते. मी सुद्धा नम्रभावाने हात पुढे केला.

हळदीच्या कांडीसारखा तो पीवळाधम्मक प्रसाद मी भक्षण केला. व सहज म्हणून नजर फिरवली तर तो तेथे ‘श्री मद् बाळकृष्णजी महाराज सुरतकर यांनी स्थापन केलेला, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ’ होता.

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तेथे गुरुपूजन सुरू होते. तेथेच माझ्या मनातील विचार बदलले. बदलीच्या कामाच्यानिमित्ताने या रस्त्यावर आलो काय आणि श्री स्वामी समर्थाच्या प्रसादाचा लाभ होतो काय, मनाला अप्रुप वाटले. ‘इच्छित मनोरथा सर्व कार्येषु सर्वदा’चा प्रत्यय आला.

गुरुपौर्णिमा असूनही श्री समर्थ साटम महाराजांचे दर्शन होईल की, नाही अशी शंका मनात असताना जणू वाळवंटात मृग नक्षत्राचा वर्षांव व्हावा तसे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाचे ध्यानीमनी नसताना दर्शन झाले. माझे डोळे डबडबून आले. निघालो होतो कुठे? पोचलो होतो कुठे?

श्री सर्मथ साटम महाराजांचे गुरू प. पू. अब्दुल रहमान बाबा यांना अक्कलकोट निवासी भक्तवत्सल स्वामी समर्थाचा अनुग्रह झाला होता. भक्तवत्सल स्वामी समर्थ खडयांमध्ये कोहिनूर हिरा, ताऱ्यांमध्ये सूर्य, फुलांमध्ये कमळ तसे भक्तांमध्ये शोभून दिसत होते. ‘श्री अक्कलकोट निवासी श्री दत्तस्वरुपाय नम:’ (हा मंत्र दाणोलीश्वरांनी त्यांचा शिष्य
बाळकृष्ण अर्थात सखाराम मेस्त्री यांना सांगितला होता व त्यावेळी, अब्दुल रहमान बाबाने माका सांगला, जो ह्यो मंत्र नियमित म्हणात त्याचा सर्व कल्याण होईल, म्हणान तुका सांगलंय. तुझा कल्याण तुका करुचा असात तर ह्यो मंत्र जप ’
- सदर ओळी या दाणोलीश्वर अर्थात सद्गुरू श्री साटम महाराज अवतार-कार्य-लीला या ग्रंथातून घेतल्या आहेत.)

मी सुद्धा ‘श्री अक्कलकोट निवासी श्री दत्तस्वरुपाय नम:’ चा मनात जागर करीत थेट दादरच्या टिळक ब्रीजवरून खोदादाद सर्कलला पोचलो. तेथे एक केळेवाला पाटीत विकायला केळी घेऊन बसला होता. खिशातील उरलेल्या अकरा रुपयाची एक डझन केळी घेऊन मी गणेशबाग येथील श्री समर्थ साटम महाराजांचे दत्तमंदिरात येऊन पोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते- मी सद्गदित अंत:करणाने श्री समर्थाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पादुकांसमोर नतमस्तक झालो.

लवकरच माझी बदली रद्द होऊन मी होतो त्याच जागी पदोन्नतीवर रुजू झालो. आज मी न चुकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री अक्कलकोट स्वामी समर्थाच्या दादर येथील मठात प्रथम जातो आणि त्यानंतर गणेशबाग, माटुंगा येथील श्री समर्थ साटम महाराजांचे दत्तमंदिरात जाऊन गुरुरायाला वंदन करतो. - भगवान पवार, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग


Viewing all articles
Browse latest Browse all 17269

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>