
अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य सैनिक संघाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी, वैनतेयकार तथा माजी आमदार जयानंद मठकर (८७) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
सावंतवाडी- अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य सैनिक संघाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी, वैनतेयकार तथा माजी आमदार जयानंद मठकर (८७) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
गेले काही दिवस बेळगाव येथील केएलई रुग्णालयात ते उपचार घेत होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. १९७४ साली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९७८ साली त्यांची फेरनिवड झाली.
कामगार नेते तसेच सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. जनता दलाच्या स्थापनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा जनता दलाचे ते अध्यक्ष राहिले होते. ‘दर्पण’ पुरस्काराचे मानकरी असलेले जयानंद मठकर यांना ‘संपादक गौरव’ पुरस्कारही प्राप्त झाला होता.
चारित्र्यवान लोकप्रतिनिधी हरपला
माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर हे सिंधुदुर्गातील आदर्श व चारित्र्यवान लोकप्रतिनिधी होते. आमदार या नात्याने त्यांनी कोकणातील सामाजिक व विकासात्मक प्रश्न विधानसभेत मांडले. मठकरसाहेब व माझे अतिशय स्नेहाचे व जिव्हाळय़ाचे संबंध होते. अनेक वेळा अनेक विषयांवर ते मार्गदर्शन करत. एक निर्मळ मनाचे, चारित्र्यवान लोकप्रतिनिधी आपल्याला सोडून गेल्याने तीव्र दु:ख होत आहे. त्यांच्या जाण्याने कोकणचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी श्रद्धांजली वाहिली.